लोणावळा : लोणावळा पोलिसांनी बुधवारी हुल्लाडबाजांवर कारवाई केली. बसस्थानक व बडोदा बँक परिसरात भरधाव वेगात दुचाकी गाड्या पळवणे, सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढणे, ट्रीपल सिट गाडी चालवणे, हेल्मेट न घालता गाडी चालवणे, विना लायसन्स गाडी चालवणे, अशा दुचाकीचालकांवरही कारवाई करण्यात आली.
‘व्हॅलेंटाइन डे’ पूर्वीचे काही डेज सुरू झाले आहेत. याकरिता शाळकरी मुले, महाविद्यालयातील मुले व इतर हुल्लडबाज याचा गाड्या घेऊन येण्याचा वावर वाढला आहे. दिवसभरात ९० जणांवर कारवाई करत ६८ हजार १०० रुपये दंड आकारणी करण्यात आली आहे. लोणावळा शहरचे नूतन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे सहायक फौजदार रमेश भिसे, हवालदार अनिल शिंदे, वॉर्डन अमर साबळे, गणेश आधाटे, नितेश पडवळ यांनी ही कारवाई केली. पुढील काही दिवस या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येणार असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.