वाडा येथील प्रचारसभेत खासदार धैर्यशील माने यांचे प्रतिपादन
वाडा- खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे हे तालुक्यातील जनतेसाठी आधार आहेत. लोकप्रतिनिधींकडे बघून आधार वाटतो, भीती वाटत नाही, सामान्य नागरिक, महिला अशाच व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे ते उभे राहतात. म्हणूनच खेडची जनता आमदार सुरेश गोरे यांच्यासोबत आहे. विकास कामांचा प्रचंड वेग आणि सामन्य माणसाचा विश्वास देणारे आमदार गोरे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ खेडच्या पश्चिम भागात गावभेट दौऱ्याप्रसंगी वाडा येथे सभा झाली, त्यावेळी खासदार माने बोलत होते. यावेळी यावेळी संपर्कनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उमेदवार आमदार सुरेश गोरे, शिवसेनेचे नेते अशोकराव खांडेभराड, जिल्हा संघटक विजया शिंदे, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अंकुश राक्षे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, प्रकाश वाडेकर, दूधसंघाचे संचालक शेखर शेटे, किरण मांजरे, राजु जवळेकर, भाजपचे जयप्रकाश परदेशी, रिपाईचे संतोष डोळस, विभागप्रमुख राजेंद्र गायकवाड आदींसह शिवसेना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह वाडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. खासदार माने म्हणाले की, राज्याच्या विधानसभेतील 288 आमदारांमध्ये खेडचे आमदार सुरेश गोरे हे पहिल्या दहा आमदारांमध्ये असल्याचा शिवसेनेला अभिमान आहे असे, त्यांनी नमूद केले. यावेळी तनुजा घनवट, शेखर शेटे, अंकुश राक्षे यांची भाषणे झाली.
- मतविभाजनाचा डाव – सुरेश गोरे
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतविभाजन घडवून आणण्याची रणनीती खेडमध्ये आखण्यात आली आहे. साम-दाम-दंड-भेद अशी नीती वापरून खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार विजय मिळविण्याचे स्वप्न पहात आहेत. त्यामुळे मतविभाजन टाळून दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्ती बाजूला करण्याचे आवाहन आमदार सुरेश गोरे यांनी केले. - खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात आमदार सुरेश गोरे यांनी युती सरकारच्या माध्यमातून केलेला विकास आणि गुन्हेगारी निपटून काढण्यासाठी केले प्रयत्न हेच गोरे यांच्या सलग दुसऱ्या विजयाचे गमक असणार आहे. खेड तालुक्यात मतविभाजन व्हावे, विकास, सुव्यवस्था, शांतता यांची साथ देणारी मते विखुरली जावीत असा काहींचा डाव आहे. त्यासाठी रसद पुरवण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू आहे. मात्र विरोधकांचा हा डाव जनतेने ओळखला आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेचा भगवा खेड तालुक्यावर पुन्हा फडकणार आहे.
-शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार