मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप दोन दिवसांपूर्वी करण्यात आला होता. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. सर्वांनीच यावर आपली प्रतिक्रिया दिली होती.
विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली की, ‘आधी मटण खाल्लं.. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला.. ‘अशी टीका शिवतारे यांनी केली होती.
दरम्यान, या सर्व प्रकारावर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. तसेच सुप्रिय सुळे यांच्या कार्यालयातनेही मोजक्या शब्दांत यावर स्पष्टीकरण दिले आहे. “खासदार सुप्रिया सुळे मागच्या काही वर्षांपासून शाकाहारी झाल्या आहेत. त्या मांसाहाराचं सेवन करत नाहीत’, असं सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
तसेच, यावर स्वतः सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की.. ‘शिवतारे काय म्हटले हे मी पाहिले नाही. त्यावर मी काय बोलणार? मला ज्याची माहिती नाही, त्यावर मी बोलत नाही. मी सकाळपासून लोकांच्या पाण्यासाठी काम करत आहे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.