“आरे बचाव’ला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा

मुंबई- “आरे बचाव’ चळवळीला खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दर्शवित राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट केली. याआधी वृक्षप्राधिकरण समितीतील राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक कप्तान मलिक यांनी मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीच्या बाजूने मतदान केले होते.

या आंदोलनाला सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दर्शवल्याने गोरेगाव आरेतील प्रस्तावित कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधातील आवाज आणखी बुलंद झाला आहे. आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकासमोर आज भर पावसातही मुंबईकरांनी एकत्र येऊन वृक्षतोडीला विरोध दर्शवला. यावेळी शेकडो मुंबईकरांनी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे आरेतील कारशेडला विरोध दर्शविला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आरे कॉलनीतील रहिवाशांशी संवाद साधला. मुंबई महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीने पास केलेल्या प्रस्तावामध्ये आरेतील झाडे तोडण्याच्या बाजूने राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी मतदान केले होते.

वृक्षप्राधिकरण समितीमध्ये राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे, या नगरसेवकानेही आरेतील कारशेडच्या बाजूने मत दिले आणि त्यामुळे सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आरे बचाव मोहिमेतील सहभागाला आंदोलकांनी विरोध केला होता. आता आरे बचाव मोहिमेचा राजकीय फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी या आंदोलनात उतरतेय का हा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.

मात्र, राष्ट्रवादीची भूमिका ही पर्यावरणाच्या बाजूनेच आहे, राष्ट्रवादी आरे बचाव चळवळीच्या बाजूनेच उभी राहील. आरेच्या प्रस्तावावेळी नगरसेवक कप्तान मलिक यांनी वृक्षतोडीच्या बाजूने मतदान का केले याच स्पष्टीकरण पक्षाकडून त्यांना विचारण्यात येईल आणि नंतर त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×