नवी दिल्ली (वंदना बर्वे) – सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल इंग्रजी भाषेत असल्यामुळे अनेकांना वाचता येत नव्हते. यामुळे अनेकांना वकिल किंवा दुस-यावर अवलंबून रहावे लागत असे. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने यावर रामबाण उपाय शोधून काढला आहे. आता मराठीसह सर्व क्षेत्रीय भाषांमध्ये निकाल उपलब्ध करून देण्यास न्यायालयाने सुरवात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आजपासून मराठीसह देशातील काही क्षेत्रीय भाषांमध्ये निकाल उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. हे निकाल सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट, अॅप आणि राष्ट्रीय न्यायीक डाटा ग्रीडवर पाहता येतील.
मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी घटनेच्या आठव्या सूचीत सामील काही भाषांमधून न्यायालयाचे निकाल उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. सध्या काही भाषांमध्ये निकाल उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि लवकरच सर्व भाषांमध्ये ते उपलब्ध होतील.
सध्या 1091 वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. यातील 14 निकाल मराठी भाषेत आहेत. उडीयामध्ये 21, कन्नडमध्ये 17, पंजाबी आणि आसामीमध्ये प्रत्येकी चार, मल्याळममध्ये 29, नेपाळीत तीन, तमिळमध्ये 52, तेलगुमध्ये 28 आणि उर्दुत तीन निकाल आहेत.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी इलेक्ट्रानिक सुप्रिम कोर्ट रिपोर्टच्या माध्यमातून जवळपास 34 हजार निकाल वकिल, विद्यार्थी आणि लोकांना क्षेत्रीय भाषेतून उपलब्ध करून दिले आहेत. आठव्या अनुसूचित 22 भाषा आहेत. यात मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, नेपाली, उडीया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, उर्दु, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरीचा समावेश आहे.