नवी दिल्ली : गोफर्स्ट एअरलाइन्सच्या विमानाने 55 प्रवाशांना विमानतळावरच सोडल्याप्रकरणी विमान वाहतूक नियामक संस्था डीजीसीएने कंपनीवर कारवाई केली आहे. डीजीसीएने कंपनीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापूर्वी एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने विमान कंपनी गोफर्स्टविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. डीजीसीएने गोफर्स्टच्या जबाबदार व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
या कारवाईबद्दल माहिती देताना, डीजीसीएने सांगितले की, गोफर्स्टने 25 जानेवारीला कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले. विमान कंपनीच्या उत्तरानुसार, टर्मिनल कोऑर्डिनेटर, व्यावसायिक कर्मचारी आणि क्रू यांच्यात विमानात प्रवाशांना बसवण्याबाबत संवाद आणि समन्वयाचा अभाव होता.
डीजीसीएने म्हटले आहे की, तपासात असे दिसून आले आहे की, विमान कंपनी ग्राउंड हॅंडलिंग, लोड आणि ट्रिम शीट तयार करणे, फ्लाइट डिस्पॅच आणि प्रवासी/कार्गो हाताळण्यासाठी पुरेशी व्यवस्था सुनिश्चित करण्यात अपयशी ठरली आहे. हे सर्व पाहता कंपनीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दिनांक 9 जानेवारी रोजी बंगळुरू विमानतळावर बंगळुरूहून दिल्लीला जाणारे गोफर्स्ट विमानाने विमानतळावरच्या बसमधील सुमारे 55 प्रवाशांना न घेताच उड्डाण केले. सोमवारी सकाळी 6.40 वाजता फ्लाइट जी-8 53 प्रवाशांना मागे सोडून निघाल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. 55 पैकी 53 प्रवाशांना दिल्लीसाठी दुसऱ्या विमान कंपनीत स्थानांतरित करण्यात आले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/leave-temple-to-religious-people-supreme-court-dismisses-ap-govt-challenge-to-hc-order-against-govt-taking-over-ahobilam-mutt-temple/
उर्वरित दोघांनी तिकीट रकमेचा परतावा मागितला, जो एअरलाइन्सने भरला. आता या प्रकरणी गोफर्स्टने पीडित प्रवाशांची माफी मागितली आहे. तसेच या प्रकरणाला जबाबदार असलेल्या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनासह आर्थिक दंडाची कारवाई केली आहे.