पुणे – संपूर्ण देशात दि. 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याला सरकारने मंजुरी दिली आहे. यात राज्यासाठी 26 लाख 77 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यासाठी राज्यातील साडेतीन हजार केंद्रांवरील यंत्रणा सज्ज झाली आहे.
राज्यात 45 वर्षे वयापुढील नागरिकांची संख्या सुमारे तीन कोटी आहे. त्या तुलनेत लसीकरण केंद्रसंख्या जवळपास साडेतीन हजार आहे. नियोजित लाभार्थींच्या तुलनेत ही संख्या अतिशय कमी असून, ती तिपटीने वाढवण्याची गरज आहे; तरच वेगाने लसीकरण होऊ शकणार आहे. नियोजित लाभार्थींची संख्या पाहता लसीकरण केंद्र वाढवण्यासह लसही वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे.
राज्याला प्रत्येकवेळी लसींचा अपुरा पुरवठा होतो. त्यामुळे त्याचे संपूर्ण राज्यात वाटप करताना मोठी कसरत करावी लागते. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनीही या संदर्भात केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली असून, लस उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे.
पुणे जिल्ह्यासाठी सव्वातीन लाख डोस
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीणसाठी 3 लाख 25 हजार 780 डोस मिळाले आहेत. त्यापैकी पुणे शहर आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी 1 लाख 40 हजार, तर पिंपरी-चिंचवडसाठी 45 हजार 780 डोस वाटप करण्यात आले आहेत. तर येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी 1 लाख डोस मिळण्याची शक्यता आहे.
केंद्राकडून राज्यासाठी बुधवारी 26 लाख 77 हजार डोस मिळाले. सध्या राज्यात 3 हजार 300 लसीकरण केंद्र आहेत. त्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार असून, यामध्ये आणखी एक ते दीड हजार केंद्र समाविष्ट होतील. डोस मिळाल्यानंतर ते तळागाळापर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याचे वेळेचे गणितही बसवावे लागते. चौथ्या टप्प्यासाठी “कोविन ऍप’ मधील “को-मॉर्बिड’ हा “ऑप्शन’ काढून टाकण्यात येणार आहे.
– डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरणाचे प्रमुख तथा आरोग्य उपसंचालक