सातारा – वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांच्या जीवनदायी कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून या प्रकल्पाला मंजूरी दिली होती. त्याच पवारांनी काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंच्याच मागणीवरुन या प्रकल्पासाठी वाढीव 58 कोटी निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी 25 कोटी रुपयांचा पहिला हप्ता सातारा पालिकेकडे नुकताच वर्ग झाला आहे. त्यामुळे हे रखडलेले काम पुन्हा सुरू होणार आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही शिवेंद्रराजेंनी दिली.
सातारा शहर व कास मार्गावरील 15 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना, शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करून घेतले होते. त्याच वेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करण्यात आला होता. वन विभाग, हरित लवाद व अन्य विभागांच्या परवानग्याही शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्याने मिळाल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती.
सद्य स्थितीत प्रकल्पाचे 75 ते 80 टक्के काम झाले आहे. वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून पुढील काम रखडले होते. हा प्रकल्प पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता; परंतु पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंच्या मागणीनुसार अजित पवार यांनी 58 कोटींचा वाढीव निधी मंजूर केला. अजित पवार व आ. शिवेंद्रराजे यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे शहराची हद्दवाढ, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला आहे.
सातारकरांच्या जिव्हाळ्याच्या कास धरण प्रकल्पाला मंजुरी आणि वाढीव निधी मिळाला आहे. 25 कोटींचा पहिला हप्ता सातारा पालिकेकडे नुकताच वर्ग करण्यात आला आहे. हे काम पुन्हा सुरू होणार आहे. जसजसे काम पुढे जाईल, तसतसा उर्वरित निधीही पालिकेला मिळणार आहे. शिवेंद्रराजेंनी काही वर्षांपूर्वी शाहूपुरीतील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 31.31 कोटींचा निधी मिळवला होता. या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. यात महावितरण कंपनी व वन विभागचा खर्च धरण्यात आला नव्हता. पाइपलाइनच्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक होते.
शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार ना. पवार यांनी या योजनेसाठी वाढीव 12 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यातून या योजनेचे पुढील काम लवकरच सुरु होणार आहे. या दोन्ही योजनांसाठी निधी दिल्याबद्दल शिवेंद्रराजेंनी पवार यांचे आभार मानले आहेत.
हद्दवाढीत समाविष्ट रस्त्यांची कामे मार्गी लागणार
पालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा सुरु आहे. यासंदर्भात त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती. शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या रस्त्यांसाठीही लवकरच भरीव निधी मिळणार आहे. त्यातून या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.