पुणे – भारतीय रेल्वे सेवेच्या काही सुविधा वेगवेगळ्या मोबाइल अॅप्सद्वारे मिळतात. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळे अॅप्स हाताळावे लागतात. शिवाय, या अॅप्सच्या व्यवस्थापनासाठी रेल्वेचे मनुष्यबळ खर्ची पडते. हे सर्व टाळण्यासाठी प्रशासन आता एकच सुपर अॅप तयार करत आहे.
याबाबत उच्चपदस्थ सूत्रांनी माहिती दिली. हे सुपर अॅप तयार केल्यामुळे कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुमारे 90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेची आयटी विंग, म्हणजेच CRIS (रेलवे सूचना प्रणाली केंद्र- क्रिस) या अॅपची निर्मिती करत आहे. सध्या तिकीट बुकिंगसाठी रेल्वेचं IRCTC अॅप उपलब्ध आहे. मात्र, इतर गोष्टींसाठी प्रवाशांना विविध अॅप्स घ्यावे लागतात. नवीन सुपर अॅप लाँच झाल्यानंतर यूजर्सना केवळ एकच अॅप पुरेसे असणार आहे.
या अॅपची तयारी आणि चाचणी करण्यासाठी तीन वर्षे लागली. हे अॅप लवकरच लॉन्च केले जाऊ शकते. सध्या या अॅपची चाचणी सुरू आहे. काही काळ चालवून त्याची चाचणीही केली जाईल. साहजिकच मोठ्या संख्येने रेल्वे वापरकर्ते हे अॅप एकाच वेळी डाउनलोड करतील. त्यामुळे त्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची सर्व बाजूंनी चाचपणी केली जात आहे.
या सुविधांचा असेल समावेश
नवीन सुपर अॅपमध्ये रेल मदद, UTS, नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम, पोर्टरीड, सतर्क, IRCTC रेल कनेक्ट, IRCTC ई-केटरिंग, IRCTC एअर अशा कित्येक सुविधा एकत्रित होणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूजर्सना वेगवेगळे अॅप्स घ्यावे लागणार नाहीत. तसेच रेल्वेचे तिकीट बुक करणे, रेल्वे ट्रॅक करणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार दाखल करणे यासह अनेक सुविधा या एकाच अॅपवर उपलब्ध होणार आहेत.