दुबई – कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर सनरायझर्स हैदराबादचा डाव 8 बाद 115 धावांवर रोखला गेला. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांना फटका देणारा ठरला. वरुण, टीम साऊदी, शिवम मावी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादचा संघ 20 षटकात 8 बाद 115 धावाच करू शकला.
कोलकात्याचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने पहिल्याच षटकात हैदराबादचा सलामीवीर फलंदाज वृद्धिमान साहाला पायचीत केले. साहा यंदाच्या स्पर्धेत स्तत्याने सरस फलंदाजी करत असल्याने त्याचे बाद होणे हैदराबादला चांगलेच महागात पडले. या धक्क्यातून त्यांचा संघ अखेरपर्यंत सावरलाच नाही.
दुसऱ्या बाजूने शिवम मावीने सलामीवीर जेसन रॉयला 10 धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्ले संपला तेव्हा हैदराबादच्या 6 षटकात 2 बाद 35 धावा झाल्या होत्या. मात्र, त्याचवेळी शाकिब अल हसनने विल्यमसनला धावबाद केले. विल्यमसनने 26 धावा केल्या.
हैदराबादचे अर्धशतक 10 व्या षटकात फलकावर लागले. त्यानंतर शाकिबच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा बाद झाला. त्यानंतर नवोदित फलंदाज प्रियम गर्गने चांगला खेळ केला मात्र, त्याला मोठी दावसंख्या उभारता आली नाही. त्याला वरुण चक्रवर्तीने 21 धावांवर बाद केले. जेसन होल्डरनेही निराशा केली.
अब्दुल समदने थोडाफार प्रतिकार केला मात्र, तरीही त्याची खेळी संघाला दीडशतकी धावाही गाठून देऊ शकली नाही. संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच त्यांचे सात फलंदाज बाद झाले होते. 19 व्या षटकात हैदराबाद संघाचे शतक पूर्ण झाले. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती, टीम साऊदी आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक – सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 8 बाद 115 धावा. (केन विल्यमसन 26, अब्दुल समद 25, प्रियम गर्ग 21, वरुण चक्रवर्ती 2-26, टीम साऊदी 2-26, शिवम मावी 2-29).