शारजा – यजुवेंद्र चहल याच्यासह अन्य गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने पंजाब किंग्जचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला. या विजयासह बंगळुरूने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. दुसरीकडे पंजाबच्या पराभवाने मुंबई इंडियन्सच्या या फेरीत प्रवेश घेण्याच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत.
बेंगळुरूने पंजाबला विजयासाठी 165 धावा करण्याचे आव्हान दिले होते. मात्र, पंजाबचा संघ 20 षटकांत 6 गडी गमवून 158 धावाच करू शकला. या पराभवासह पंजाबचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पंजाबचा साखळी फेरीतील अखेरचा सामना आता चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.
पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक आग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. स्थिरावलेला राहुल शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर हर्षल पटेलकडे झेल देत 35 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 39 धावा करून बाद झाला. निकोलस पूरननेही निराशा केली. मयंक देखील चांगला खेळत असताना 42 चेंडूत 6 चौकार व 2 षटकार यांच्या सहाय्याने 57 धावा करून परतला. त्या पाठोपाठ सरफराज खानही बाद झाला. बेंगळुरूच्या युजवेंद्र चहलने पंजाबच्या प्रमुख फलंदाजांवर वर्चस्व राखताना संघाच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. त्यातच एडन मार्करमही बाद झाल्यामुळे पंजाबचा पराभव स्पष्ट दिसू लागला. अखेरच्या षटकातही पंजाबच्या फलंदाजांना नियंत्रणात ठेवत बेंगळुरूने थाटात प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
त्यापूर्वी, कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी बेंगळुरूला अर्धशतकी सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. स्थिरावलेला कोहली मोझेस हेनरीक्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्याने 24 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 25 धावा केल्या. त्यानंतर डॅनियल ख्रिस्तियनही बाद झाला. दुसऱ्या बाजूने देवदत्त पडिक्कल मात्र, चांगला खेळत होता. त्यालाही मोठे फटके मारण्याचा मोह आवरता आला नाही व तो 4 चौकार आणि 2 षटकार फटकावत 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल शो सुरू झाला.
मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी चौथ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली. यात मॅक्सवेलच्या फटकेबाजीचा मोठा वाटा होता. त्याने आपले अर्धशतक अवघ्या 29 चेंडूत पूर्ण केले. तो 33 चेंडूत 3 चौकार व 4 षटकार मारून 57 धावांवर बाद झाला. मात्र, त्यापूर्वी त्याने संघाला दीडशतकी मजल मारून दिली होती. डिव्हिलियर्सने 18 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने 23 धावा केल्या. बेंगळुरूचा संघ किमान 180 पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत असतानाच डावातील अखेरच्या षटकात पंजाबच्या महंमद शमीने तीन गडी बाद केले. बेंगळुरूचा डाव 20 षटकांत 7 बाद 164 असा रोखला गेला. पंजाबकडून मोझेस हेनरीक्स व महंमद शमी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 7 बाद 164 धावा. (ग्लेन मॅक्सवेल 57, देवदत्त पडिक्कल 40, विराट कोहली 25, एबी डिविलियर्स 23, मोझेस हेनरीक्स 3-12, महंमद शमी 3-39). पंजाब किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 158 धावा. (मयंक आग्रवाल 57, लोकेश राहुल 39, यजुवेंद्र चहल 3-29).