अभिनेता सनी देओलचा २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर-एक प्रेम कथा’ चित्रपट आठवतो का ? ‘हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ सारखे सुपरहिट डायलॉग्स असणारा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. १७ कोटी रुपयांत बनून तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५३ कोटींची कमाई केली होती. हे सगळे पुन्हा सांगायचे कारण म्हणजे, लवकरच या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती चित्रपटाच्या संबंधित सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘आमची टीम गदरच्या सिक्वेलसाठी गेली १५ वर्ष काम करत आहे. या सिक्वेलमध्येही तारा (सनी दिओल), सकीना(अमिषा पटेल) आणि त्यांचा मुलगा जीत या तीन मुख्य पात्रांभोवतीच ही कथा फिरणार आहे. शिवाय, भारत-पाकिस्तान हा विषय कथेचं मूळ सूत्र असेल. असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता चित्रपटाचा सिक्वेल कसा असेल आणि बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल हे पाहणे गरजचे आहे.