मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील आयकॉनिक “हॅंड पंम्प’ सिन लोक आवर्जून पाहतात. सोशल मीडियावर देखील या चित्रपटातील अनेक व्हिडिओ आजही व्हायरल होतात. या चित्रपटात सनी देओलसह अभिनेत्री अमिषा पटेलने मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान, या चित्रपटाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘गदर-2’ चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील ‘गदर-2’च्या शूटिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.
दरम्यान, या चित्रपटासाठी सनी आणि आमीषा पटेल या दोघांना कास्ट करण्यासाठी निर्मात्यांना मोठी रक्कम मोजावी लागली आहे. ‘गदर 2’ चित्रपटासाठी सनी आणि आमीषा यांनी कोट्यवधी रुपये मानधन घेतलं आहे. या चित्रपटात तारा सिंग ही मुख्य भूमिका साकारण्यासाठी अभिनेता सनी देओल याने तब्बल 5 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तर, दुसरीकडे सकीनाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री आमीषा पटेल हिला तब्बल 2 कोटी रुपये इतके मानधन देण्यात आले आहे. सध्या सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे.
सनीने चित्रपटाच्या पहिल्या भागात ज्या पद्धतीने ‘हॅंड पंम्प’ उखडून टाकला होता. तोच स्वॅग सनीचा ‘गदर 2’ मध्येही दिसणार आहे. हा एक फुल ऑन अॅक्शन पॅक्ड चित्रपट असणार असणार आहे. आता प्रेक्षक सुद्धा ‘गदर 2’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग हिमाचल प्रदेश, लखनऊ आणि इंदूरमध्ये झाले आहे. दरम्यान, ‘गदर: एक प्रेम कथा’ 2001 साली रिलीज झाला होता, ज्याची कथा देशाच्या फाळणीवर आधारित होती. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉक बस्टर चित्रपट ठरला होता.