अशोक सुतार
फेब्रुवारी 2020मध्ये होणाऱ्या जगप्रसिद्ध रिओ कार्निव्हलची आता चर्चा सुरू आहे. रिओ कार्निव्हलला पृथ्वीवरील सर्वात मोठा उत्सव म्हटले जाते. हा सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम असून दरवर्षी ब्राझील येथील रिओ दि जनेरिओ या शहरात साजरा केला जातो. रिओ दि जनेरिओ हे ब्राझील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. पोर्तुगीजांच्या काळात सन 1763 ते 1960 दरम्यान ही ब्राझीलची राजधानी होती. 2016मध्ये रिओ दि जनेरिओमध्ये ऑलिंपिक स्पर्धा झाल्या होत्या. शहराला दक्षिण अटलांटिक महासागराचा समुद्रकिनारा लाभला आहे. येत्या वर्षात 21 ते 26 फेब्रुवारी 2020 दरम्यान रिओ कार्निव्हल होणार आहे. यासाठी जगभरातील पर्यटक आतापासूनच ब्राझीलला जाण्याची तयारी करत आहेत.
रिओ कार्निव्हल हा ईस्टर पूर्वी होणारा लेंटच्या उपवास हंगामापूर्वीचा महत्त्वाचा उत्सव आहे. या कार्निव्हलमध्ये प्रामुख्याने उत्सव परेड, पार्टी, ओपन एअर परफॉरमेंस केले जातात. रिओ दि जनेरिओ शहराच्या नावाचा पोर्तुगीज भाषेत “जनेरिओची नदी’ असा अर्थ होतो. या कार्निव्हलसाठी जगभरातून सुमारे दोन दशलक्ष पर्यटक या शहरात येतात. रिओमधील पहिला कार्निव्हल उत्सव 1723मध्ये झाला होता. रिओ कार्निव्हलमध्ये सांबा शाळांमधील विद्यार्थी रेव कार्निव्हल परेड रेव्हल्स, फ्लोट्स आणि शोभा यात्रा काढतात. यात फॅन्सी वेशभूषा, पथनाट्य, विविध प्रकारचे नृत्य, नृत्यनाटिकांचा समावेश असतो. तसेच समूह नृत्य, गिटार वादन केले जाते.
रिओ कार्निव्हल उत्सवाला 1640पासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याकाळात ग्रीक वाइन देवतांचा सन्मान करण्यासाठी मेजवानी आयोजित केल्या गेल्या. रोमन लोक द्राक्ष कापणीचा देव, डाय ऑनिसस किंवा बॅकचस याची उपासना करत असत. पोर्तुगीजांनी एन्टडो’ हा सण सुरू केला आणि यामुळे ब्राझीलमध्ये कार्निव्हलच्या जन्मास प्रेरणा मिळाली. त्यानंतर 1917 साली आफ्रिकन साम्बा संगीत सुरू झाले. त्याचा प्रभाव रिओ कार्निव्हलवर पडला. आता साम्बा संगीत हे ब्राझील संगीताची ओळख बनली आहे.
स्ट्रीट कार्निव्हलमध्ये सांबा नृत्य प्रसिद्ध आहे. सांबा कार्निव्हल इंस्ट्रूमेंट हा ब्राझीलच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. एकाचवेळी तालासुरात गाणे, नृत्य आणि परेड यांची मेजवानी असते. सर्वात मोठे पथनाट्य रिओच्या सेन्ट्रोमधील सिनेलॅंडिया स्क्वेअरवर आयोजित केले जाते. आनंद घेण्यासाठी जगभरातील लोक येथे येतात.