– सुचित्रा दिवाकर
स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे पार पडलेली यंत्रमानवांची पत्रकार परिषद हा मानवाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या अद्भुत आविष्कारांचा विस्मयकारक सोहळाच होता. या आगळ्यावेगळ्या पत्रकार परिषदेविषयी…
“रोबो करेल काम, माणूस करेल आराम’ अशी चर्चा अलीकडील काळात जागतिक पटलावर ऐकू येते. याचे संकेतही जगाला गेल्या आठवड्यात मिळाले आणि त्याची दखल घेणे काळाची गरज आहे. स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे 8 जुलै रोजी स्मार्ट रोबोंची इतिहासातील पहिलीवहिली पत्रकार परिषद पार पाडली. या पत्रकार परिषदेबाबत अजूनही अनेक अनभिज्ञ राहू शकतात. कारण, अशा प्रकारच्या पत्रकार परिषदेची अपेक्षा कोणी केली नसेल. या पत्रकार परिषदेत रोबोंना विचारलेल्या प्रश्नांना मिळणारी उत्तरे पाहून भविष्यातील जग कसे असेल, याची कल्पना करता येईल.
जिनिव्हातील 51 यंत्रमानवांची पत्रकार परिषद ही मानवी मेंदूला एखादा 440 व्होल्टचा झटका देणारी ठरली; परंतु रोबोंचे भविष्यातील चित्र पाहता त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल. आज नाही तर उद्या ही स्थिती निर्माण होणार आहे. विश्वास ठेवा, ही वेळ लवकरच येणार आहे. मनुष्य आराम करेल आणि त्याचे काम रोबो पार पाडेल. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या 51 रोबोंनी उपस्थितांना एक आश्वासन दिले की, मनुष्यजातीच्या विरोधात कधीही बंड करणार नाही.
यादरम्यान आर्टिफिशियल इंटिलिजन्सचे 3000 च्या आसपास तज्ज्ञ उपस्थित होते. या तज्ज्ञांनी सर्व प्रकारचे प्रश्न विचारले आणि जवळपास सर्वच प्रश्न मनुष्यकेंद्रित होते. सोफिया नावाची रोबो म्हणाली, की आम्ही जगाला माणसांपेक्षा चांगल्या रितीने चालवू शकतो. आमच्याकडे मानवी भावना नसतील; परंतु आम्ही तथ्याच्या आधारावर नक्कीच सक्षम निर्णय घेऊ शकतो. सोफियाला विचारले, की माणसांच्या विरोधात बंडखोरी करणार का? यावर तुम्हाला असे का वाटते, असा प्रतिप्रश्न तिने केला. याबाबत मला ठाऊक नाही. पण मला तयार करणाऱ्या व्यक्तीने माझ्याशी चांगले वर्तन केले. त्यामुळे मी आनंदी आहे, असे उत्तर दिले.
त्यानंतर तिला विचारले, की तुझ्यामुळे लोकांच्या नोकरीवर गंडांतर येईल का? तेव्हा ती म्हणाली, आम्ही लोकांसमवेत एकत्र येऊन काम करू. माझ्यामुळे एखाद्याची नोकरी जाण्याची वेळ येणार नाही आणि धोकाही नसेल. यावेळी तिला विचारले, की आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या तंत्रज्ञानाला कायद्याच्या चौकटीत आणावे का? यावर उत्तर देताना रोबो म्हणाला, की भविष्यात होणाऱ्या बदलाबाबत सर्वांनाच सजग राहणे गरजेचे आहे. सकारात्मक चर्चा आवश्यक आहे.
अन्य एका रोबोने तर आर्टिफिशियल इंटिलिजन्समुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची शक्यता फेटाळून लावली. तो म्हणाला, की तंत्रज्ञानावर बंदीची नाही तर त्याला अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे. आपण मनुष्यप्राण्याबरोबर एकत्र येऊन जगाला चांगले भवितव्य देऊ शकतो. रोबो हे आता केवळ मशीन राहिलेले नाही. या पत्रकार परिषदेत रॉबी नावाच्या रोबोची देखील चर्चा राहिली. या रोबोच्या तंत्रज्ञानाची खासियत म्हणजे, त्याची रचना मानवी स्नायूंपासून प्रेरित आहे. या रोबोत असणारे 70 जोड हे मानवी स्नायूंशी मिळतेजुळते आहेत. रॉबीचे निर्माता रॉल्फ फाइफर म्हणतात, की
रॉबी हा नव्या पिढीचा रोबोचा व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्याने माणसांबरोबर एखाद्या मित्रांप्रमाणे गप्पा मारायला हव्यात. विशेष म्हणजे रॉबीचा चेहरा हा फेसबुकमधून मतांचा कौल घेत तयार करण्यात आला आहे. फाइफर म्हणतात की, एक दिवस प्रत्येकांच्या घरात रोबो दिसेल; परंतु रोबो हे एखाद्या विशिष्ट कामासाठी असतील का, हे आताच सांगता येणार नाही. पण असतील निश्चित. त्याचा निर्णय प्रामुख्याने बाजारच घेईल.
युरोपियन महासंघात यापूर्वी रोबोकडून कोणती कामे करून घ्यायला हवीत, याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यात सहभागी होणाऱ्या 60 टक्के लोकांच्या मते, रोबोवर मुलांचा सांभाळ करणे आणि ज्येष्ठांच्या देखभालीची जबाबदारी सोपवू नये. संगणक तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ नियोल शाकी हे रोबोवर दीर्घकाळापासून संशोधन करत आहेत. ते म्हणतात, मुलांचा सांभाळ करणाऱ्या रोबोंची निर्मिती जपान आणि दक्षिण कोरियाच्या 14 कंपन्या करत आहेत. त्यांना इंग्रजीचे शिक्षण तीन वर्षांपूर्वीच देण्यात आले आहे. दक्षिण कोरियाने रोबोचा वापर हा तुरुंगाचे रक्षक म्हणून देखील केला आहे. आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची वेळ आली आहे. रोबोमुळे जग बदलत आहे आणि त्यांचे विश्वदेखील बदलत आहे. आता केवळ ते खेळणे राहिलेले नाही. नियोल शार्की यांच्या संशोधनातून एकच निष्कर्ष निघतो की, रोबो हा प्रौढ व्यक्तीपेक्षा उपयुक्त ठरत आहे.
तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत आणि नुकसानही. रोबोवर कोणीही आरोप करू शकत नाही की लैंगिकतेच्या भावनेतून त्याने एखाद्याला स्पर्श केला. यात कोणत्याही प्रकारच्या नैतिकतेचा प्रश्न राहणार नाही. पण अन्य एका प्रोफेसरने धोक्याचा इशाराही दिला आहे. केंब्रिज विद्यापीठाचे प्रोफेसर पीटर रॉबिन्सन म्हणतात, की आपल्या घरात अशा प्रकारच्या शक्तिशाली मशीनचा वापर होत असेल तर कदाचित तो हानिकारक जोडीदार म्हणूनही सिद्ध होऊ शकतो. म्हणून पीटर रॉबिन्सन म्हणतात, की चेहरा ओळखणारा रोबो तयार करायला हवा. तसेच समोरचा व्यक्ती अडचणीत आहे किंवा त्याला वेदना होत आहेत, हे देखील रोबोला जाणवायला हवे.