मंचर – किल्ले शिवनेरी ते किल्ले पुरंदर छत्रपती शिवराय व शंभुराजे भेट पालखी सोहळा रविवार (दि. 5) ते सोमवार (दि. 13) या कालावधीमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती शिवचरित्र व शुंभूचरित्र कथाकार हभप बाजीराव महाराज बांगर यांनी दिली. हभप बाजीराव महाराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य संघाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीराजे व शंभूराजे भेट पालखी सोहळा सुरू करण्यात आला.
पालखी सोहळ्याचा मार्ग ः किल्ले शिवनेरीवरून छत्रपती शिवरायांना पंचगंगांचा अभिषेक पूजा व शिवाई देवीची पूजा, आरती व गोंधळ करून पालखी प्रस्थान करेल. जुन्नर, नारायणगाव, कळंब, मंचर, पेठ, खेड (राजगुरूनगर) चिंबळीफाटामार्गे श्री क्षेत्र आळंदी (ज्ञानोबारायांचे दर्शन), श्री क्षेत्र तुळापूर येथे त्रिवेणी संगमावर राजांना स्नान, श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे शुंभूराजांना मानवंदना व आरती, केसनंद श्री क्षेत्र थेऊर गणपती (अभिषेक व पूजा), लोणी काळभोर, वडकी नाला, दिवेघाटमार्गे सासवड कोंडीत श्री क्षेत्र नारायणपूर व किल्ले पुरंदर येथे भेटीचा सोहळा होणार आहे. रोज मुक्कामी प्रबोधन व्याख्यान, शाहीर पोवाडे, मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती स्वराज्य संघाचे सचिव शामकांत निघोट, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भांगे यांनी दिली.