नवी दिल्ली – अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मरण पावलेला इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडर कासम सुलेमानी हा नवी दिल्ली आणि लंडनमधील दहशतवादी हल्ल्यातही सहभागी होता. त्याच्या मृत्युने दहशतीचे साम्राज्य संपले, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याचे समर्थन केले.
ट्रम्प यांनी दिल्लीवरील दहशतवादी हल्ल्यात सुलेमानी याच्या सहभागाचा कोणताही तपशील ट्रम्प यांनी दिला नाही. मात्र, 2012 मध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात दिल्ली पोलिसांनी इराणीयन रिव्हॉल्युशनरी गार्डचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावेळी नवी दिल्लीत इस्रायली राजदुतावर हल्ला झाला होता. तसाच हल्ला जॉर्जीयातही झाला होता. मात्र त्यावेळी बॉम्ब निकामी करण्यात आला होता.
इस्रायली राजदूत आणि त्याची पत्नी जात असलेल्या मोटारीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बॉम्ब चिटकवला होता. ताल योहुशोहा कोरेन या महिला त्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. तर मोटारचालक आणी अन्य दोघे किरकोळ जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात इराणी वृत्तसंस्थेसाठी काम करणारा पत्रकार महंमद अहमद काझ्मी याला अटक केली होती. काझ्मी हा सध्या जामीनावर बाहेर आहे.
बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या अल-कुदस या मुख्य लष्करी दलाचा प्रमुख जनरल सुलेमानी मरण पावला. इराकच्या शक्तीशाली हाशेद अल – शाबी संघटनेचा उपप्रमुखही या हल्ल्यात मृत्यूमुखी पडला.
निष्पाप लोकांच्या हत्या ही सुलेमानीची दुष्ट सवय होती. नवी आणि लंडनपर्यंतच्या दहशतवादी कटांत त्याचा सहभाग होता. सुलेमानीच्या दुष्ट कारवाया आठवून त्याच्या दहशतीचे साम्राज्य संपल्याने सुटकेचा नि:श्वास टाकत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
त्याने अलीकडे इराकमध्ये अमेरिकेला लक्ष्य बनवले होते. त्यात केलेल्या रॉकेट हल्ल्यात एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला. तर चार अमेरिकन सैनिक गंभीर जखमी झाले होते. बगदादमधील आमच्या दुतावासावर झालेल्या हिंसक आंदोलन सुलेमानीच्या इशाऱ्यावरून केले होते, असे ट्रम्प यांनी फ्लोरिडातील मार- ए- लागो येथे पत्रकारांना सांगितले. मध्य पुर्वेला अशांत ठेवण्यासाठी तो 20वर्ष दहशतवादी कट रचत होता, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.