मुंबई – भारतीय संघाचा तसेच आयपीएलमधील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने खळबळजनक विधान केले आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून एकत्र खेळत असूनही श्रीलंकेच्या लसित मलिंगाने कधीही मला टीप्स दिल्या नाहीत असे सांगत बुमराहने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएलचे सर्वाधिक चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजांची आणि गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. मलिंगानेच मला यॉर्कर चेंडू कसा टाकायचा त्याच्या टीप्स दिल्याचे अनेकांना वाटत असेल मात्र ते खरे नाही. त्याने मला कधीही कोणत्याही टीप्स दिल्या नाही, असे बुमराहने स्पष्ट केले आहे.
भिन्न किंवा प्रतिकुल परिस्थितीत गोलंदाजाने मन शांत कसे ठेवायचे ते त्याच्याकडून मी शिकलो मात्र प्रत्यक्ष गोलंदाजीबाबत त्याने कधीही मला कोणतेही सल्ले दिले नाहीत. लहान असताना मी मित्रांबरोबर रबरी चेंडूने खेळायचो. रबरी चेंडू स्विंग व्हायचे. चेंडू फलंदाजाच्या अंगावर टाकणे तसेच पायात गोलंदाजी करण्याचा आमचा उद्देश असायचा. कोणत्याही फलंदाजाला बाद करायचे असेल तर सातत्याने यॉर्कर टाकणे महत्वाचे असते ते मी त्या काळात शिकलो, त्याचा आज मलाच नव्हे तर संघालाही लाभ होत आहे. आज मी त्याच मुळे यॉर्कर टाकण्याच यशस्वी होत आहे, असेही बुमराहने सांगितले.