नेवासा फाटा -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन केला आहे. या काळात तालुक्यातील गरीब कुटुंबावर उपासमारीची दुर्दैवाने वेळ आल्यास आपण अशा कुटुंबांना मदत करू, अशी माहिती संजय सुखदान यांनी दिली. तसेच आज नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमास धान्य, किराणा व भाजीपाला दिला.
सुखदान म्हणाले, नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमाचे संचालक मगर यांनी दूरध्वनीवरून आश्रमात अठरा वृद्ध आहेत. मात्र किराणा नसल्याने मागील पाच दिसांपासून आम्ही फक्त भात खात आहोत. त्यामुळे किराणा, भाजीपाला व पिठाची व्यवस्था होईल का, अशी विचारणा केली. त्यानंतर ही हकिगत आपण नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डेरे यांना सांगितली व वृद्धाश्रमात पीठ, किराणा पोहच करण्याची परवानगी मागितली.
त्यांनीही ती दिली. त्यानंतर आपण पाच पायली गहू, पाच पायली बाजरीचे पीठ, किराणा व भाजीपाला घेऊन वृद्धाश्रमात गेलो. तेथे वृद्धांची भेट घेतली. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. त्यांचा आनंद पाहून आपण मनातून खूप सुखावून गेलो. आशा करतो की आपण ही अशीच गरजूंना मदत करून असा आनंद घेताल पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.