‘त्या’ 14 दिवसांविषयी लिहिणार

करोनामुक्‍त झालेल्या नागरिकांची प्रतिक्रिया : डॉक्‍टर्स, नर्ससह सर्वांप्रती कृतज्ञता

पुणे – डॉक्‍टरांसह नर्स आणि सर्वांच्या ऋणात राहू, तसेच विलगीकरणाच्या या 14 दिवसांविषयी लिहून जागृती करू असेही या बऱ्या झालेल्या नागरिकांनी सांगितले.

“आम्ही राज्यातील पहिले रुग्ण होतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मनावर ताण आला होता. मात्र, डॉक्‍टर, नर्स यांच्यासह सर्व यंत्रणेने जो विविध माध्यमातून संवाद साधला आणि धीर देऊन आमच्यावर यशस्वी उपचार केला, त्याबद्दल आम्ही डॉ. नायडू आणि ससून रुग्णालयातील डॉक्‍टर, नर्स, कर्मचारी, महापालिकेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी यांचे ऋणी आहोत. आम्ही कायम या सर्वाच्या ऋणात राहू. आज जरी आम्ही घरी परतत असलो, तरी डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतरच घराबाहेर पडू. रुग्णालयातील सर्व रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे. तेही लवकरच बरे होऊन बाहेर येतील, असा विश्‍वास घरी सोडलेल्या दाम्पत्याने व्यक्त केला.

याशिवाय या 14 दिवसांविषयी लिहिणार आहे. “आज जगभरात करोना विषाणूचा उद्रेक झालेला आहे. देशातही अशीच परिस्थिती निर्माण झालेली असताना नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला कळते आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी किमान काही दिवस तरी घरी बसून, हा आजार परतवून लावावा, असे आवाहन करण्याबरोबरच “माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता आणि या दिवसात आलेले अनुभव आणि नागरिकांनी केलेले सहकार्य यावर काही दिवसांनी लिखाण करणार आहे, याशिवाय यासंदर्भात एक व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करणार असल्याचे या नागरिकांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.