नवी दिल्ली – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मागील काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालयाच्या रडावर आहे. तिची अनेकदा ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली असून जॅकलिनला महागडे गिफ्ट देणाऱ्या सुकेश चंद्रशेखर याच्याविषयी धक्कादायक खुलासे झाले आहेत.
सुकेशने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्लायलयाचा फोन नंबर वापरून आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या कुटुंबातील असल्याचं सांगून जॅकलिनला फसवल्याचं समजतं. ईडीने मनी लॉन्ड्रींगविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
ईडीने याआधी दोनवेळा जॅकलिनची चौकशी केली. तसेच तिचा जबाब नोंदवून घेतलं. यामध्ये तिने म्हटलं की, सुकेश याने आपली ओळख शेखर रत्न वेला अशी करून दिली होती. तो डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत माझ्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र आपण प्रतिसाद दिला नव्हता, असंही तिने ईडीला सांगितलं होतं.
दरम्यान अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टला सरकारी कार्यालयातून कॉल आला होता. त्यात तिला सांगण्यात आलं की, जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात राहिला हवं. तो मह्त्त्वाचा व्यक्ती आहे. त्याला जॅकलिनशी संपर्क साधायचा आहे.त्यानंतर जॅकलिनने सुकेश यांच्यासोबत संपर्क साधला. यासाठी सुकेश यांनी अमित शाह यांच्या कार्यालयाच्या फोनचे स्पूफ केल्याचं समोर आलं आहे. स्पूफ केल्यानंतर कॉल करणाऱ्या मुळ कॉलरचा नंबर न दिसता, दुसराच नंबर दिसतो.
दरम्यान सुकेशने आपण सन टीव्हीचा मालक असून आपण जयललिता यांच्या कुटुंबातील असल्याचं म्हटलं. तसेच मी तुझा चाहता असून दक्षिण भारतीय चित्रपटात तुला घेऊन काम करायच सांगत, सन टीव्हीच्या इतर प्रोजेक्टविषयी देखील सुकेश यांनी जॅकलिनला माहिती दिली होती.