शिमला – हिमाचल प्रदेशच्या विधानसभा संकुल तपोवनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जोरावर स्टेडियमवर मंगळवारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विविध मागण्यांसाठी निदर्शने करत असलेले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते विधानसभेला घेराव घालण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांना पोलीसांनी अडवले. यादरम्यान काॅंग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि युवक काॅंग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यात एक महिला पोलीस कर्मचारीही जखमी झाली आहे.
हाणामारी दरम्यान, एक युवक काॅंग्रेस कार्यकर्ता बेशुद्ध पडला होता. जखमीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यादरम्यान युवक काॅंग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली. कार्यकर्ते विधानसभा घेरावावर ठाम राहिले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यानंतर काॅंग्रेस कार्यकर्ते पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडजवळ धरणे धरून बसले. यानंतर डीसी डॉ. निपुण जिंदाल यांनी घटनास्थळी पोहोचून काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी डीसी मार्फत शासनाला निवेदन दिले. डीसींच्या आश्वासनानंतर युवक काँग्रेसने आंदोलन संपवले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निगम भंडारी म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, जुनी पेन्शन आणि इतर प्रश्नांवर युवक काॅंग्रेस शांततेने आंदोलन करत होते, मात्र दरम्यान कार्यकर्त्यांशी पोलिसांकडून बाचाबाची झाली आहे. तणाव वाढल्याने जमावावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला आज दोन ड्रोनचा सहारा घ्यावा लागला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मुकेश यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, युवक काॅंग्रेस बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन करत होते, परंतु पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर सभापती विपीन परमार यांनी यासंदर्भात माहिती गोळा करून पुढली निर्णय घेणार असल्याचे सांगितले.