शहरातील रुग्णालयांना महिन्याला 11 हजार मेट्रिक टनांची गरज
पुणे – जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार करोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना करोनाच्या उपचारांत ऑक्सिजनचा वापर होत आहे. गेल्या काही महिन्यांत 3000 मेट्रिक टन असलेला ऑक्सिजनचा वापर आता 11 हजार मेट्रिक टनांवर गेला आहे. रुग्ण वाढीचा वेग पाहता ऑक्सिजनची गरज आणखी भासणार आहे. यामुळेच उत्पादक कंपन्यांना ऑक्सिजन उत्पादन वाढविण्याचे आदेश आहेत.
शहराच्या विविध भागात प्राणवायूची कमतरता जाणवत असल्याच्या तक्रारी येत असताना अन्न आणि औषध प्रशासन विभाग यावर लक्ष ठेवून आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून करोनाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
शहरातील रुग्णालयांतून ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊनच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत प्राणवायू उत्पादकांना आदेश दिलेले आहेत. यानुसार वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 टक्के ऑक्सिजन पुरवठ्याचे प्रमाण 80 टक्के करण्यात आले. तर, उद्योगांसाठी पूर्वी 60 टक्के पुरवला जाणारा ऑक्सिजन आता केवळ 20 टक्के करण्यात आला आहे. यानुसार ऑक्सिजन पुरवठा करण्याचे डिसेंबर 2020 पर्यंत बंधनकारक करण्यात आलेले असून आता वाढती मागणी लक्षात घेता ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना उत्पादन वाढीचे आदेशही दिले गेले आहेत.
नव्या प्रकल्पाचीही तयारी…
पुणे शहर तसेच ग्रामीण भागात छोट्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा होणे गरजेचे आहे, अशी मागणीही होत आहे. सध्या, पिंपरी तसेच चाकण औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन निर्मिती कंपन्या आहेत. वाढती मागणी लक्षात घेता चाकण येथे नवे प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
…म्हणून कृत्रिम ऑक्सिजनची गरज
करोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूचा वापर करावा लागत आहे. रुग्णाचे प्राण वाचविण्यात ऑक्सिजन थेरेपीचा मोठा उपयोग होत आहे. कोविड-19 या विषाणूचा हल्ला घशावाटे फुफ्फुसांवर होत असतो. यामुळे रुग्णांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागते. फुफ्फुसाच्या शेवटच्या भाग अल्वेओलाय (वायुकोश) यास लागण झाल्यानंतर रुग्णाच्या जीवितास धोका उद्भवतो. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक प्राणवायू (ऑक्सिजन) घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. परंतु, अल्वेओलाय याच भागाला इजा होत असल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, अशावेळी कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते. दुर्दैवी बाब म्हणजे अशा गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्यानेच ऑक्सिजनची गरज अधिक प्रमाणात भासू लागली आहे.