नवी दिल्ली – कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या क्षणी पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ अशा फरकाने पराभव करत ३६ वर्षानंतर फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत राहिले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला.
या अगोदर दोन्ही संघांनी फिफा विश्वचषक ही स्पर्धा दोनदा जिकंलेली आहे. गतविजेत्या फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये विजेतेपद जिंकले होते. तर दुसरीकडे अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले होते. गेल्या अनेक दशकांपासून उराशी बाळगलेलं स्टार फुटबॉलपटू मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
दरम्यान, अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच, अक्षय कुमारही चर्चेत आला आहे. आता अक्षय कुमार आणि मेस्सीचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर सध्या सोशल मीडियावर अर्जेंटिनाच्या जर्सीमधील अक्षय कुमारचे फोटो शेअर केले जात आहे.
पाठोपाठ अक्षय कुमार मेस्सीचं बायोपिक करणार असून त्यात मेस्सीची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर या चर्चेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. अगदी अक्षयने मेस्सीच्या बायोपिकसाठी तयारी सुरू केली असल्याचंही म्हटलं जात आहे.
Akshay already getting ready for his next movie pic.twitter.com/XVri79qR6I
— Hash Brown (@jainzeee) December 18, 2022
अर्थात असं काहीही नाही. अक्षयचे हे फोटो बहुचर्चित ‘हाऊसफुल 3’च्या एका सीनमधील आहेत. सध्या त्याचे हेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत आणि त्यावरून युजर्स अक्कीची मजा घेत असल्याचं दिसून येत आहे. अक्षय कुमार मेस्सीच्या बायोपिकसाठी सज्ज आहे, असं एका युजरने म्हटलं आहे. अन्य एका युजरने तर अक्षयने कधीच मेस्सीच्या बायोपिकची तयारी सुरू केलीये, असंही म्हटलं आहे.