कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी प्रयोग
नव्या वर्षात अंमलबजावणी होणार
पुणे : शालेय शिक्षण विभागातील सर्वच विभागांना वेळेत कामे करण्याची शिस्त लागावी, यादृष्टीने शिक्षण आयुक्तालयापासून शिक्षणाधिकाऱ्यापर्यंतच्या सर्व कार्यालयांची दिनदर्शिका तयार करण्यात येत आहे. या दिनदर्शिकांचे एकत्रिकरण करुन संपूर्ण शिक्षण विभागासाठीच एकच आदर्श शैक्षणिक दिनदर्शिका (कॅलेंडर) निर्माण केली जात आहे. नव्या वर्षापासून या शैक्षणिक दिनदर्शिकेची अंमलबजावणी होणार आहेत.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शालेय शिक्षण विभागाचा कायापालट करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा आराखडा आखला आहे. टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणीही केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या डायऱ्यांपाठापोठ आता प्रत्येक कार्यालयाची महिनानिहाय वर्षभराचे शैक्षणिक कॅलेंडर तयार करण्यासाठी विविध कार्यालयांकडून माहिती जमा करण्यात आली आहे.
यात प्रामुख्याने शिक्षण आयुक्तालय, शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी या सर्वच कार्यालयांचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यालय प्रमुखांची शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सोमवारी (दि. 19) महत्वपूर्ण बैठकही घेतली. त्यात शैक्षणिक कॅलेंडरच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
अधिकाऱ्यांच्या बैठका, दौरे, कार्यालयांची दप्तर तपासणी, विविध प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, प्रस्ताव मागविणे व त्यावरील प्रक्रिया पूर्ण करणे ही सर्व कामे कॅलेंडरनुसारच मार्गी लागणार आहेत. यातून अधिकाऱ्यांना कामकाज जलद गतीने करण्याची सवयही लागणार आहे. शैक्षणिक गुणवत्ताही सुधारता येणार आहे, असे मांढरे यांनी सांगितले.