अयोध्या- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम जन्मभूमी-बाबरी मशीदचा वाद मिटला असून श्री रामजन्मभूमी येथे मंदिर उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊननंतर या जागेचे सपाटीकरण करण्यात आले होते. कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचं काम आता आणखी वेगाने सुरु आहे.
राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 65 टक्के काम पूर्ण झालं असून, याचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
सध्या या मंदिरातील ग्रह मंडप आणि सिंहद्वाराचं काम सुरू आहे. गर्भगृहाच्या मागील भाग ज्याला महापीठ म्हटलं जातं तेसुद्धा जवळपास तयार झालं आहे. तर, राम मंदिरात लावले जाणारे स्तंभही तयार झाले असून, या स्तंभांची यांची उंची 20 फूट आहे.
याशिवाय रामाच्या पुतळ्यामध्ये बोटे, चेहरा आणि डोळे कसे असावेत यावर देशातील महत्त्वाच्या शिल्पकारांनी मंथन सुरू केले आहे. ते तयार करण्यासाठी 5 ते 6 महिने लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, अयोध्येतील हे भव्य राम मंदिर जानेवारी 2024 साली रामभक्तांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. तसेच, हे मंदिर हजारो वर्षे सुरक्षित ठेवण्यासाठी रिटेनिंग वॉल बनवलं जातं आहे.