पुसेगाव – खटाव तालुक्यात कार्यरत असलेले विद्यमान जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी शिवसेनेला राम राम ठोकला. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये प्रवेश केला.
खटाव तालुक्यामध्ये अगदी शिवसैनिक या पदापासून शिवसेनेमध्ये निष्ठेने काम करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून प्रताप जाधव यांचे नाव सातारा जिल्ह्यात अग्रक्रमाने घेतले जाते. विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो प्रश्नांना प्रताप जाधव यांनी निश्चितपणे न्याय दिला आहे. शिवसेना आणि प्रताप जाधव हे खटाव तालुक्यामध्ये एक समीकरण बनले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतरही प्रताप जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असणारी निष्ठा व्यक्त केली होती.
सातारा जिल्हाप्रमुख हे पद नुकतेच प्रताप जाधव यांना मिळाले होते. आमदार महेश शिंदे यांच्या बंडानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली होती. प्रताप जाधव यांनी आपल्या खांद्यावरती हे शिवधनुष्य उचलले होते. त्यामुळे अनेक शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांना निश्चितपणे आशा निर्माण झाली होती. पण आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केल्याने निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्यांना मोठा धक्का बसला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गळ्यामध्ये भगवा गमाचा टाकून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांचे स्वागत केले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार महेश शिंदे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर काटकर यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.