पुणे – ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये नवजात बालकाच्या गंभीर हृदय रोगावर यशस्वी शस्त्रक्रिया
इंदापूर येथील सार्थक नावाच्या दोन महिन्यांच्या मुलाचा जन्म गंभीर हृदयाच्या आजाराने झाला होता. या आजाराला ‘Total anomalous pulmonary venous connection’ असे म्हणतात. सार्थकचा रंग जन्मापासून निळा होता तसेच त्याचे वजन केवळ २.९ किलो होते. हृदयाच्या गंभीर आजारामुळे त्याला श्वास घेण्यास देखील त्रास होत होता.
सार्थकच्या पालकांनी त्याला इंदापूर येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु इंदापूर येथील डॉक्टरांनी त्यांना सार्थकला पुण्यात ज्युपिटर हॉस्पिटल येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. ज्युपिटर हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सार्थकला तपासले असता त्यांना असे लक्षात आले की, सार्थकची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. सार्थकच्या अनेक तपासण्या केल्यानंतर बालरोग ह्रदयरोग सर्जन डॉ. अभिजीत नाईक, बालरोग ह्रदयरोग तज्ञ डॉ. राहुल सराफ आणि बालरोग तज्ज्ञ व पेडियाट्रिक इंटेंसिव्ह केअरचे प्रमुख डॉ. श्रीनिवास तांबे यांनी सार्थकची टीएपीव्हीसीची शस्त्रक्रिया केली.
या शस्त्रक्रियेनंतर ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थती निर्माण झाली. अशावेळी सार्थकला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये हलविणे आवश्यक होते. परंतु शस्त्रक्रियेमुळे त्याची छाती उघडीच होती, तसेच तो व्हेंटिलेटर होता आणि त्याच्या शरीराला असंख्य नळ्या लावण्यात आल्या होत्या. सार्थकला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर २४ तासांनंतर त्याची छाती बंद करण्यात आली. तसेच त्याला पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे हलव्यात आले.
यावेळी अधिक माहिती देताना पेडियाट्रिक इंटेंसिव्ह केअरचे प्रमुख डॉ. श्रीनिवास तांबे म्हणाले की, “ सार्थकची शस्त्रक्रिया अत्यंत कठीण होती कारण शस्त्रक्रियेसाठी त्याचे सर्व रक्त शरीरातून काढले जाणे आवश्यक होते. त्यालाच (हायपोथर्मिक टोटल सर्कुलेटोरी अर्रेस्ट). असे म्हणतात. ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीम ने ही शस्त्रक्रिया पार पडली.”
यावेळी बोलताना ज्युपिटर हॉस्पिटल मधील बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत नाईक म्हणाले, “ सार्थकला ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी त्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.परंतु त्याच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना शस्त्रक्रियेचा खर्च करणे शक्य नव्हते म्हणून हार्ट फाउंडेशन आणि ज्युपिटर फाउंडेशन या संस्थांनी त्याच्या सर्व उपचारांचा खर्च उचलला.यावेळी सार्थकचे वडील श्री सोमनाथ करंडे म्हणाले की,ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि त्यांच्या टीमने माझ्या सार्थकला नवीन जीवन दिले त्यामुळे मी ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि व्यवस्थापनाचे आभार मानतो.