सातारा – गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून गणेशोत्सवात तब्बल तीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. साताऱ्यात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासह आगामी गौरीचं आगमनामुळे वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेसाठी चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. शहरात येणारी आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर वाहन तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत.
त्यामध्ये मोळाचा ओढा, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप, बोगदा परिसरातील ठिकाणांचा समावेश आहे. या शिवाय मुख्य चौकातही पोलीस आणि होमगार्ड तैनात आहेत. साध्या वेशातील पोलीस आणि निर्भया पथकही गस्त घालत आहेत. सातारा शहर व उपनगरात बंद घरांमध्ये चोऱ्या होऊ लागल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. स्थानिक गुन्हे व गुन्हे प्रकटीकरण शाखा विशेषत्वाने सक्रिय झाली आहे.
पुण्याहून एसआरपीचे दोन प्लाटून साताऱ्यात दाखल झाले आहेत. एका प्लाटूनमध्ये 22 कर्मचारी असतात. जिल्हा पोलीस दलातील 1756 कर्मचारी, 55 इतर अधिकारी, पोलीस निरीक्षक 12, उपविभागीय पोलीस अधिकारी 5, आरसीपी प्लाटून तीन तुकड्या (एका तुकडीमध्ये 12 जण), स्ट्रायकिंग फोर्सच्या तीन तुकड्या (एका तुकडीमध्ये 20 जण) या शिवाय 974 होमगार्डही गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.