मंचर- पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने पारगाव – शिंगवे (ता.आंबेगाव) आणि बेल्हे (ता. जुन्नर) येथील दोन चोऱ्यांचा तपास लावून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तर त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत. अल्पवयीन मुलाकडुन दोन्ही चोऱ्यांमधील 1 लाख 6 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पुणे ग्रामीणचे पोलीस पथक आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करोना संचारबंदी पेटोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पारगाव शिंगवे येथील मोबाईल दुकान फोडून मोबाईल फोन व इतर माल चोरी करणारा हा त्याच्या माळवाडी साकुर (ता. संगमनेर) येथील राहत्या घरी असल्याचे समजले होते.त्या ठिकाणी पोलिसांच्या पथकाने तात्काळ पोहचून संबधित अल्पवयीन मुलाकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली. त्याने चोरीची कबुली देऊन सदरचा गुन्हा त्याचे दोन साथीदार गणेश लहानु आगिवने व नवनाथ विजय पवार दोन्ही (रा. माळवाडी, साकुर, ता. संगमनेर) यांच्यासोबत केला असल्याचे सांगितले. बेल्हे (ता.जुन्नर) येथील एक कपड्याचे दुकान फोडून मुद्देमाल चोरल्याचेही त्याने सांगितले. त्याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यातील एकुण 45 हजार रुपये किंमतीचे 43 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.आळेफाटा पोलिस ठाण्यात या गुन्ह्यातील एकुण 61 हजार 770 रुपये किंमतीचा कपड्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोन्ही गुन्ह्यातील 1 लाख 6 हजार 770 रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी दिली. सदर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी करुन मुद्देमालासह खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी मंचर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र मांजरे, पोलीस कर्मचारी शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, दीपक साबळे, राजु मोमीन, अक्षय नवले यांनी सहभाग घेतला.