सरळ बॅटने खेळले तरच यश मिळेल – रहाणे

साउदम्पटन  – जागतिक अजिंक्‍यपद कसोटीचा अंतिम सामना येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. या सामन्यात तसेच इंग्लंडमधील वातावरणात सुरुवातीची काही षटके सरळ बॅटने खेळली तरच यश हाती लागेल, असे मत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्‍य रहाणे याने व्यक्‍त केले आहे.

इंग्लंडमध्ये सध्या तिथे असलेल्या वातावरणात फलंदाजी करणे आव्हानात्मक आहे. इंग्लंडमध्ये फलंदाजी करण्याचे एक तंत्र आहे. इंग्लंडमध्ये सरळ बॅटने फलंदाजी केली तर जास्त धावा होऊ शकतात. त्याचबरोबर खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळही मिळतो. गोलंदाजीचा अंदाजही घेता येतो. त्यामुळे फलंदाजी करताना सरळ फटके मारणे आणि जास्त काळ खेळपट्टीवर स्थिरावणे, या दोन गोष्टी केल्या तर भारतीय संघ चांगली धावसंख्या उभारू शकतो, असेही रहाणे म्हणाला.

दडपण घेण्याची गरज नाही

न्यूझीलंडविरुद्ध हा अंतिम सामना होत आहे. त्यांनी नुकतेच इंग्लंडला पराभूत करत मालिका जिंकली असली तरीही त्यांचे दडपण घेण्याची गरज नाही. आपण आपल्या नैसर्गिक खेळावरच लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल होण्यापूर्वी झालेल्या अन्य लढतींतही आम्ही अपयशातून यशाकडे झेप घेतली आहे.

खेळाडूंचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. जसे आम्हाला इंग्लंडमधील वातावरणात खेळायचे आहे तसेच न्यूझीलंडलाही खेळायचे आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी समान स्थिती आहे. या स्थितीचा भक्‍कमपणे सामना जो संघ करेल तोच यशस्वी ठरेल, असेही रहाणे म्हणाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.