विविधा | अच्युत बळवंत कोल्हटकर

– माधव विद्वांस

शंभरवर्षांपूर्वी आपल्या जहाल लेखणीने स्वातंत्र्याचा संदेश जनतेत पोहोचविणारे संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन. ते वृत्तपत्र संपादक, लेखक, कादंबरीकार, नाटककार, नाट्यनिर्माते, अभिनेते, समाज प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध होते. त्या काळात सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठविणारे पत्रकार होते. ते काळाच्याही पुढे जाऊन प्रागतिक विचार करणारे विचारवंत होते. 

107 वर्षांपूर्वी बहुजनांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. अस्पृश्‍यतेचा कलंक काढून टाकला पाहिजे. युरोपिय लोकांकडून हिंदी जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात जितके अन्याय झालेले आहेत, त्या सर्वांपेक्षा जास्त अन्याय या सहा कोटी लोकांना अस्पृश्‍य मानण्यात झाला आहे. हे त्यांनी 13 एप्रिल, 1914 चे “युगांतर’मध्ये नमूद केले.

ते मूळचे सातारचे. त्यांचा जन्म वाई येथे 1 ऑगस्ट, 1879 रोजी झाला. त्यांच्या आईचे लहानपणीच निधन झाल्याने त्यांचे चुलते बळवंतराव यांनी त्यांचा सांभाळ केला म्हणून ते वडिलांच्या जागी “बळवंतराव’ यांचे नाव लावत. त्यावेळी कर्ते सुधारक आणि बोलके सुधारक यातील कर्ते सुधारक म्हणून त्यांचे वडील वामनराव कोल्हटकर यांना ओळखले जाई, कारण पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर त्यांनी दुसरा विवाह विधवेशी केला.

बी.ए., एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही काळ सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि नागपूर येथे अनुक्रमे शिक्षक व वकील म्हणून काम केले. “शुभसूचक’ या सातारच्या पत्रासह एकूण 27 वृत्तपत्रांतून त्यांनी काम केले. त्यातील 26 पत्रांचे ते संपादक होते. वर्ष 1907 मध्ये ते “देशसेवक’ ह्या पत्राचे संपादक झाले. त्याबरोबरच त्यांची अनेक चढउतारांनी भरलेली वृत्तपत्रीय कारकीर्द सुरू झाली. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनी कारावास भोगला.

वर्ष 1915 साली सुरू केलेल्या “संदेश’ या पत्राने मराठी वृत्तपत्रसृष्टीला वेगळी दिशा दिली. कल्पकतेने भावनेला आवाहन करणारे, तसेच विनोदी उपहासात्मक लेखनाने ते प्रतिस्पर्ध्याची भंबेरी उडवून टाकणारे त्यांचे अग्रलेख वाचकांना भावले होते. “संदेशचा अहेर’, “बेटा गुलाबच्या कानगोष्टी’, “चहा, चिवडा, चिरूट’, “संदेश दरबारचा पदवीदान समारंभ’ इ. चटकदार सदरे, त्याचे आकर्षक मथळे यामुळे संदेश सर्वदूर पोचला होता. चित्तवेधक, बातम्या, आकर्षक मथळे यांमुळे मराठी वृत्तपत्रीय लेखनात बहुरंगीपणा आला व ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले.

संदेश लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच सरकारची वक्रदृष्टी वळली व संदेश बंद पडला. त्यानंतर संजय, चाबूक, चाबूकस्वार यांसारखी अनेक पत्रे त्यांनी काढली. त्यांनी श्रुतिबोध (1912) आणि उषा (1913) ही मासिके चालविली. सौ. वत्सलावहिनी यांचे प्रसिद्ध व अप्रसिद्ध लेख (1915), चोरी कशी करावी? (1925), अच्युतराव कोल्हटकर स्मारक ग्रंथ (भाग 1 ते 3, 1933-35) इ. पुस्तकांतून त्यांचे निवडक लिखाण संकलित झालेले आहे. स्वामी विवेकानंद, नारिंगी निशाण व संगीत मस्तानी यांसारखी नाटकेही लिहिली.

स्वत:ची नाटक कंपनी काढली. काही कादंबऱ्या लिहिल्या, तथापि “संदेशकार’ हीच त्यांची ओळख कायम राहिली. 15 जून, 1931 रोजी त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.