फत्तेचंद रांका : कुरणच्या जयहिंदमध्ये पदवी प्रदान सोहळा थाटात
नारायणगाव -आयुष्य हे खूप मर्यादित आहे. त्यासाठी आयुष्य विधायक कार्यासाठी खर्च करावे. वेळेचे महत्व ओळखून त्याचा वापर करावा. व्यावसायिक जीवनात चढउतार येतच असतात. परंतु सचोटी आणि व्यावसायिक कौशल्य विकसित केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन रांका ज्वेलर्स पुणेचे व्यवस्थापकीय संचालक फत्तेचंद रांका यांनी केले.
कुरण येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सहावा पदवी प्रदान कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ होते.
यावेळी 232 विद्यार्थ्यांना प्रदवी प्रदान करण्यात आली. यावेळी संस्थेचे खजिनदार जितेंद्र गुंजाळ, संचालिका शुभांगी गुंजाळ, उद्योजक संदीप मुथ्था, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य वाय. एस. गुंजाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
समारंभाची सांगता पसायदानाने झाली. प्राचार्य डॉ. गरकळ यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालय परीक्षा अधिकारी प्रा. एस. बी. भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एच. एस. महाजन व प्रा. आर. ए. गाडेकर यांनी केले.