रेडा – नंदीवाले व भटक्या-विमुक्त समाजाचे आराध्यदैवत अंबाजी-लिंबाजी देवस्थान वडापुरी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीत आहे. या ठिकाणी लाखो भक्तगणांची वर्दळ असलेले हे देवस्थान अनेक समस्या व सुख सुविधांच्या विळख्यात सापडले आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम, दुग्ध विकास तसेच सामान्य प्रशासन राज्यमंत्रि दत्तात्रय भरणे यांनी शासन दरबारी या देवस्थानास विकासात्मक रूप देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याने काही कालावधीतच या अंबाजी लिंबाजी देवस्थानचा कायापालट होणार आहे. भटक्या-विमुक्त तसेच काशीकापडी व नंदीवाले आदी समाजाचे अंबाजी-लिंबाजी हे देवस्थान आराध्य दैवत आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून वडापुरी येथील देवस्थान परिसरात तब्बल एक महिन्याची यात्रा या देवस्थानाची भरत असते, मात्र या देवस्थानला यात्रा भरवण्यासाठी अपुरी जागा पडत आहे, या ठिकाणी अद्ययावत स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था नाही, असे असले तरी देखील जुन्या पद्धतीने कापडी कोपी करून भक्तगण पंधरा दिवस ते एक महिना या देवस्थान परिसरात मुक्काम करतात. यामध्ये जुन्या पकालीने देवस्थानला पाणी घातले जाते.
शासनस्तरावरून अंबाजी-लिंबाजी देवस्थानसाठी जागा उपलब्ध करून देणे व या ठिकाणी भक्तनिवास बांधणे तसेच मुबलक स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे, यासाठी राज्यमंत्री भरणे यांनी पावले उचलली आहेत. त्यामुळे वडापुरी गावचा विकास या देवस्थानच्या माध्यमातून होणार आहे.मागील तीस चाळीस वर्षापासून या देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे कोणतेही प्रयत्न कोणीही केलेले दिसत नाहीत.
देवस्थान परिसरातील अतिक्रमणे निघणार
वडापुरी येथील अंबाजी-लिंबाजी देवस्थान विकास करण्यासाठी परिसरामध्ये पुर्वी झालेली अतिक्रमणे आहेत. ती अतिक्रमणे काढून अतिक्रमणधारकांना पुनर्वसन करण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.