अखेर दापोडीतील सब-वे वाहतुकीस खुला

तीन वर्षांची प्रतीक्षा संपली : वाहतूक कोंडीतून दिलासा

पिंपळे गुरव – तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दापोडीतील सीएमई समोरील सब-वे महापालिकेने वाहतुकीसाठी खुला केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेने घाईघाईने हा सब-वे खुला केला असला तरी वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दापोडी येथील हॅरिस पुलाला समांतर पुलाचे काम पूर्ण झाले आहे. दापोडी व बोपोडी परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होत असे. तसेच पुणे- मुंबईची देखील वाहने याच मार्गाने होत असल्याने पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने दापोडी येथील सीएमई गेटच्या परिसरात मोठा भुयारी मार्ग बनविण्यात आला असून या भुयारी मार्गावरील सब -वे हा वाहतुकीसाठी नुकताच खुला करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे.

पूर्वी हॅरिस पूल व बोपोडी या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे हॅरिस पूल व दापोडी, फुगेवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, नागरिक वैतागून जायचे. याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे महापालिका यांच्या समितीने दापोडी येथील हॅरिस पुलास समांतर पूल उभारण्यात आले. या पुलाच्या शेजारी कॉलेज ऑफ मिलेटरी इंजिनियरिंग म्हणजे सीएमई आहे. या पुलावरुन सीएमईच्या लष्करीच्या मोठ्या वाहनांची ये-जा असते.

यामुळे वाहतूक कोंडी होत होती. मग यावर उपाय म्हणून या मार्गावर सब-वे व सीएमईच्या गेटसमोर मोठा भुयारी मार्ग विकसित करण्यात आला. 20 मार्च 2016 ला पालिका सभेत याला मंजुरी देण्यात आली. पण कोटीच्या घरातील हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी व सीएमईच्या लष्करी विभागाकडून जागा घेण्यास काही कालावधीत गेला. नंतर मेट्रोचे या ठिकाणी असलेला मार्ग तयार होण्यास वेळ लागला. अखेर हा पूल व सब-वे व भुयारी मार्ग सुरू झाला आहे. मात्र या परिसरात दुभाजक देखील उभारण्यात आले नाहीत. या मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांनामुळे अपघात होण्याची शक्‍यता नागरिकांमधून वर्तविली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.