माजी नगरसेवकाने निरीक्षकाला दमदाटी केल्याचा निषेध
पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी
सातारा – नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला दमदाटी व शिवीगाळ करणाऱ्या माजी नगरसेवकाच्या निषेधार्थ पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. संबंधितांनी माफी मागितल्याशिवाय कामावर परतणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने नगराध्यक्षांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांवर त्यांची मनधरणी करण्याची वेळ आली.
नगरसेविका सीता हादगे यांचे पती व माजी नगरसेवक राम हादगे यांचे आणि आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांची वॉर्डात फॉगिंग होत नसल्याच्या तक्रारीवरून शुक्रवारी दुपारी जोरदार खडाजंगी झाली होती. हादगे यांनी अपशब्द वापरत कायगुडे यांना दमदाटी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. त्यानंतर आरोग्य विभागाच्या 220 कर्मचाऱ्यांनी सोमवारी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. त्यांच्या काम बंद आंदोलनामुळे शहरातील सफाईचे काम ठप्प झाले. नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक निशांत पाटील, पाणी पुरवठा समितीचे सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य समितीचे सभापती विशाल जाधव, नरेंद्र पाटील व नगरपालिका कागमार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
संबंधित नेहमी कामाच्या वेळेला त्रास देतात. त्यांना तातडीने समज देण्यात यावी. त्यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली. अखेर सौ. माधवी कदम यांनी मध्यस्थी केली. प्रकरण फार वाढवू नका आचारसंहिता सुरू आहे. संबंधितांना समज देण्यात येईल. कोणताही वाद न होता कामे समन्वयाने होतील, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी दिल्यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.