नवी दिल्ली : देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाचा स्विकार करण्यास नकार दिला आहे. अरूण जेटली यांच्या पत्नीने राज्यसभेचे उपाध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांना पत्र लिहून निवृत्तीवेतन घेण्यास नकार दर्शवला असून हे वेतन गरजूंना देण्यात यावे असेदेखील पत्रात म्हटले गेले आहे.
मागील महिन्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांना निवृत्ती वेतन देण्यात आले होते. परंतु, या निवृत्ती वेतनाचा स्विकार जेटली कुटूंबियांनी करण्यास नकार दिला. यासाठी लिहिण्यात आलेल्या पत्रात अरूण जेटली यांच्या पत्नीने, “अरुण जेटली यांनी देशाची दोन दशके सेवा केली आहे आणि अरूण ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने आपल्याला जायचे आहे. म्हणून आमच्या कुटूंबाला मिळणारे निवृत्ती वेतन हे एखाद्या गरजूला म्हणजेच राज्यसभेच्या एखाद्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला देण्यात यावे अशी आमची इच्छा आहे आणि मला खात्री आहे हे अरूणलाही समाधान देणारे असणार आहे.” असे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, या पत्राची एक प्रत पंतपधान नरेंद्र मोदी यांनादेखील पाठवण्यात आली आहे.