पुणे – राज्यात शालेय पोषण आहार योजनेत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना आता अतिरिक्त पोषणमूल्य असलेली न्युट्रिटिव्ह स्लाइस (चिक्कीसारखा पदार्थ) देण्यात येण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची माहिती सादर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.
राज्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यासह आता न्यूट्रिटिव्ह स्लाइसही देण्यात येणार आहे. न्युट्रिटिव्ह स्लाइसचा उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरवठादाराकडून उपलब्ध झालेल्या न्युट्रिटिव्ह स्लाइस शाळांना पुरवल्या जातील. शाळा स्तरावरून त्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.
विद्यार्थ्यांना न्युट्रिटिव्ह स्लाइसचे वाटप करण्याच्या नियोजनासाठी संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. त्यात पहिली ते आठवीच्या वर्गांची 1 ऑगस्ट रोजी असलेली पटसंख्या, शाळा जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, शासकीय आणि खासगी अनुदानित शाळा या पैकी कोणत्या व्यवस्थापनाची आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे.