बेलसर -महाराष्ट्रातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा “गॅस’वर आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने गावातच तळ ठोकून सर्वेक्षण, उपाययोजनांवर भर दिला. या एका रुग्णानंतर आतापर्यंत झिकाचा दुसरा रुग्ण आढळलेला नाही.
दरम्यान, दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष पथके बुधवारी (दि. 5) बेलसरमध्ये दाखल झाले होते. या पथकाने गावाची पाहणी केली असून ते केंद्राला अहवाल देणार आहे. तर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका त्याचबरोबर शिक्षक ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील स्वयंसेवकांची विशेष समिती गठीत करण्याचे आदेश पथकाकडून देण्यात आले आहेत.
त्या समितीद्वारे गावामध्ये इथून पुढेही सर्वेक्षणाचे काम नियमित केले जाणार आहे.
दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पी नैन, डॉ. हिंमत सिंग यांच्यासह राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. बेलसरमधील आरोग्य विभागाच्या आणि ग्रामपंचायतीच्या नियोजनाबाबत केंद्रीय पथकाकडून समाधान व्यक्त करण्यात आले
याप्रसंगी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, डॉ. मंगेश गोखले (एनआयव्ही पुणे), दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पी नैन, डॉ. हिंमत सिंग यांच्यासह राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञ डॉ. अजय बेंद्रे डीएमओ पुणे, डॉ. महेंद्र जगताप स्टेट अँटमॉलॉजिस्ट, डॉ.प्रनिल कांबळे स्टेट हेल्थ अधिकारी, डॉ.डेकाटे सहाय्यक संचालक हिवताप पुणे,डॉ.कदम उपसंचालक आरोग्य सेवा पुणे,
महेश उकरंडे आरोग्य सहाय्यक पुणे, डॉ. आवटी, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला जाधव, डॉ.भरात शितोळे,डॉ.सागर डांगे, सरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच धीरज जगताप ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
केंद्रीय पथक सकाळी दहाच्या सुमारास बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झाले.आरोग्य विभाग ग्रामपंचायत बेलसर यांच्यातील संवादानंतर पथकाने सर्वेक्षण केले. ग्रामपंचायतीने केलेल्या उपाययोजनांना निदर्शनास आल्या.
पथकाने व्यक्त केले समाधान
गेली अनेक दिवस जिल्हा सोबतच तालुका आरोग्य विभाग प्रामाणिकपणे सर्वेक्षणाचे काम करीत आहे त्यामध्ये आशा वर्कर तसेच आरोग्य कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीने एकंदरीत केलेल्या नियोजनाबाबत केंद्रीय शास्त्रीय पथकाने त्यांचे कौतुक केले आहे.
धुरळणी, बॅनर, अनाउन्समेंट माहितीपत्रके, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या जनजागृती, गरोदर मातांना मच्छरदानी त्याचबरोबर मच्छर कॉईल भेट दिल्याबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले आहे.
केंद्रीय पथकाचे आवाहन
झिका विषाणू ला घाबरण्याची गरज नाही परंतु आपल्या स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत. त्याचबरोबर आरोग्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, प्रशासनास सहकार्य करावे. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.