पुणे(प्रतिनिधी) – महा करिअर पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना करिअर निवडताना आधुनिक कोर्सेसची अत्यंत उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे याचा सर्वच विद्यार्थ्यांना अधिक फायदा होईल, असे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टल सुरु करण्यात आले असून त्याचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून 10 हजार व्यक्तींनी उपस्थिती लावली.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन करिअर विषयक माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्यातील 9 ते 12 वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा फायदा होईल. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 556 कोर्सेस व 21 हजार व्यावसायिक संस्था व महाविद्यालयाची माहिती दिली असून कोर्सेसचा कालावधी, फी, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध नोकरी इत्यादी माहिती या पोर्टलवर मिळेल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना 27 मे पासून सरल प्रणालीचा आयडी व पासवर्ड वापरुन पोर्टलचा वापर करता येणार आहे.
मुला-मुलींना आपले शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो. संधी व गरज विचारत घेऊन हे पोर्टल तयार केले असल्याचे युनिसेफ इंडियाचे शिक्षण विभाग प्रमुख टेरी डुरीयन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पोर्टल तयार केल्याबाबत अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपसंचालक व समन्वयक विकास गरड यांनी केले.