पुणे – स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे शास्त्री रस्त्यावरुन अपहरण करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची खबर पोलीस नियंत्रण कक्षास दिली. दरम्यान अपहरण प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची दोन ते तीन पथके आरोपींच्या मागावर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मुळच्या नांदेड येथील 28 वर्षाच्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले. तो नांदेड येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. घटनेच्या दोन दिवस अगोदरच तो पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दाखल झाला होता. शास्त्री रस्त्यावर त्याने जनक वाचनालयात प्रवेश घेतला होता.
वाचनालय रात्री अकरा वाजता बंद झाल्यावर तो इतर मुलांसोबत पायी त्याच्या खोलीवर चालला होता. इतक्यात एका इर्टिगा कारमधून पाच व्यक्ती उतरले. त्यांनी जबरदस्तीने त्याला गाडीत घालून नेले. ही बाब त्याच्यासोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलिसांना कळवली.
यानंतर पोलिसांनी वाचनालयातून त्याची माहिती घेत नातेवाईकांशी संपर्क साधला. त्याच्या कात्रज येथे रहाणाऱ्या मावस भावाने तक्रार दाखल केली आहे. इर्टिगा गाडी नांदेड येथील असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. पोलिस सर्व शक्यता पडताळून तपास करत आहेत. पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, पोलीस निरीक्षक दादा माने तपास करत आहेत.