यवत (पुणे) – केडगाव (ता. दौंड) येथील महावितरणचे शिरूर -दौंड चे वितरण कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांनी पाटस येथील एका दिव्यांग व्यक्तीची थकीत वीजबिलाची 11 हजार रुपयांची रक्कम भरून माणुसकीचे दर्शन घडवले.
पाटस येथील दिव्यांग व्यक्ती राजेंद्र शंकर खंडाळे यांचे घरगुती वीजबिल एकूण 15 हजार रुपये थकीत होते. आर्थिक परिस्थिती बेताची, उत्पन्न अतिशय तुटपुंजे, त्यातून दिव्यांगत्व, दोन मुलींच्या शिक्षणाचा भार त्यातून कसेबसे 4 हजार रुपये जमवून थकीत वीजबिलाची रक्कम भरून आर्थिक परिस्थिती नसल्याने आणि मुलींचे शिक्षण असल्याने उर्वरित वीजबिल भरू शकत नाही. 4 हजार रुपये भरून वीज जोडण्यात यावी, असा विनंती अर्ज त्यांनी महावितरण विभागाकडे केला होता.
हा अर्ज अभियंता एडके यांच्याकडे जाताच त्यांनी खंडाळे यांच्या अर्जामधील सत्यता पडताळून त्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. खंडाळे यांची स्थिती बिकट असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी उर्वरित 11 हजार रुपयांची थकबाकी त्वरित ऑनलाइन भरून त्याचदिवशी त्यांचा वीजपपुरवठा सुरळीत करून देण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिला. वीज जोड पुन्हा सुरळीत करण्यात आला. यावेळी एका अधिकाऱ्यांचे माणुसकीचे दर्शन दौंड तालुक्यात चर्चेत आले.
दौंड तालुक्यातील सर्वच पत्रकार संघाच्या वतीने अभियंता राजेंद्र येडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एम. जी. शेलार,संदीप सोनवणे, अनिल गायकवाड, मनोज खंडाळे, कर्मचारी उपस्थित होते.