सत्यवान उभे यांची ग्वाही : इंदापूर शहरासह तालुक्यात शिवसेना शाखांचे उद्घाटन
रेडा – इंदापूर, बारामती व दौंड या तिन्ही तालुक्यांतील शिवसैनिक जोमाने काम करीत आहेत. निष्ठावान शिवसैनिकांना पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका शिवसेनेची आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शिव वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम केले जाईल. आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जमाफीसाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शिवसेनेच्या चार शाखांचे उद्घाटन तर शहरांमध्ये तीन शाखांचे उद्घाटन, एसटीचे स्मार्ट कार्ड वाटप, शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे व शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख ऍड. राजेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय काळे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, विशाल बोंद्रे, शहर प्रमुख महादेव सोमवंशी, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे, संदीप चौधरी, नितीन कदम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
उभे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. तरीदेखील शिवसैनिकांनी संघटनेचे जोमाने काम करावे. गोरगरिबांच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी व्हावे. शिवसैनिक जनतेची सेवा करण्यात कमी पडणार नाहीत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, राज्यातील उपेक्षित जनतेला अर्थसहाय्य करणारी शासकीय महामंडळाच्या कर्जदारांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी समोर येत आहे.
या मागणीचा विचार शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचवला जाईल. त्यामुळे आर्थिक विकास महामंडळाची कर्जमाफी करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असेल, असे उभे यांनी सांगितले.
शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे काम करीत असले तरी देखील त्यांचे संघटनेकडे अजिबात दुर्लक्ष नाही. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांना जनतेची सेवा करण्यासाठी आगामी काळात चांगली संधी दिली जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.