खडकवासला – खडकवासला धरण चौपाटीवर अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फत अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. येथील 31 अनधिकृत टपऱ्या हातगाड्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर ठिकाणी व्यावसायिकांनी कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता अधिकाऱ्यांनी करावाई सुरू ठेवली.
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, अतिक्रमण निरीक्षक अजय गोळे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक लक्ष्मण जोंधळे, विठ्ठल ओमासे, मंथन आमले व प्रथमेश पाटील यांनी ही कारवाई केली.
यावेळी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक श्रीकृष्ण सोनार व वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षिका मेघा राऊत यांनीही अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी सहकार्य केले.
“रस्ता व पदपथावर कोणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर कारवाई करण्यात आलेल्या टपरीधारक, हातगाडीधारकांना सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी सूचनांचे पालन न केल्याने आज कारवाई करण्यात आली. यापुढेही कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.” – अजय गोळे, (अतिक्रमण निरीक्षक)