लोणी काळभोर -कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या वतीने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. कुणीही नियमांचा भंग केल्यास 1000 रुपये दंड करण्यात येणार असून त्याच्या विरोधात ग्रामपंचायतींच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच सुनीता धुमाळ यांनी दिली.
सरपंच धुमाळ म्हणाल्या, तीन दिवस कडक जनता कर्फ्यू (गाव बंद), त्यानंतरचे दोन दिवस सकाळी 8 ते 11 यावेळेत किराणा व भाजीपाला विक्री सुरू ठेवण्यात आहे. ही मोहीम गेले बरेच दिवस गावात सुरू आहे. दोन दिवस प्रत्येकी तीन तास किराणा माल व भाजीपाला खरेदी विक्रीसाठी मिळत असल्याने त्या ठिकाणी गर्दी होत नाही. सोशल डिस्टन्स पाळला जातो. भाजीपाला विक्रीची सोय बाजार मैदानात करण्यात आली आहे. तेथे ग्रामपंचायतीचे कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित असतात. त्यामुळे सोशल डिस्टंन्सचे काटेकोर पालन केले जाते.
या ठिकाणी दुसऱ्या गावातील भाजीपाला विक्रीसाठी आणण्यास व दुसऱ्या गावातील व्यापारी व खरेदीदारांना येण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. फक्त कुंजीरवाडी ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतात पिकणारा भाजीपाला विकण्याचे व खरेदी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्याची अजिबात शक्यता नाही.
हेअर कटिंग सलून मालक व कर्मचारी यांनी कुठेही (घरी जाऊन किंवा दुकानात) सलून काम केल्याचे निदर्शनास आल्यास 1000 दंड व गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.