“काश्‍मिरी युवकांना सीमेपलीकडे नेऊन दिलं जातं दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण”

श्रीनगर – सीमेपलीकडे नेऊन दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध प्रकारे काश्‍मिरी युवकांना फूस लावण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न विविध मार्गानी सुरू आहेत, असे चिनार कॉर्पस्‌चे जनरल ऑफिसर कमांडर बी. एस. राजू यांनी सांगितले.

सुरक्षा दले करवाई करतील आणि आधिक जीवित हानी होईल, या कुटील हेतूने गर्दीच्या भागात सुरक्षा दले आणि नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून सुरू आहेत. सीमेपलिकडून युवकांना दहशतदाकडे ढकलण्याचा मुख्य सुत्रधार पाकिस्तान आहे. अनेक विद्यार्थ्यांना पाकिस्तानात शिक्षणासाठी बोलावले जाते.

तेथे त्यांचे मतपरिवर्तन करून दहशतवादाच्या जाळ्यात ओढले जाते. त्यांना नियंत्रण रेषेवरून दहशतवादी कृत्ये करण्यासाठी भारतात पाटवले जाते, असा दावा राजू यांनी केला. ते म्हणाले या सर्व प्रकारात काहींना प्रचारासाठी वापरले जाते. त्यातील काहींना प्र्रशिक्षण दिले जाते. त्यांना नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करत भारतात पाठवतात.

दहशतवाद्यांच्या नव्या भरतीसाठी समाज माध्यमांद्वारे पाकिस्तान अपप्रचार करत आहे. किरकोळ लक्ष्यांवर पिस्तूलचा वापर किंवा हातबॉम्ब फेकण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना उत्तेजित केले जात आहे. त्यातून मग त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये स्थान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गर्दीच्या भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत नागरिकांची जीवित हानी झाली तर त्यांना त्याचा प्रचार करून आमची प्रतिमा खराब करायची आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटवायची, असा हा डाव आहे. मात्र पाकिस्तानच्या या आकृतीबंधाची स्थानिक लोकांना कल्पना आहे, असे ते म्हणाले.

दहशतवाद्यांची भरती 2018 च्या तुललनेत 2020मध्ये प्रचंड प्रमाणात नियंत्रणात आली होती. सध्या खोऱ्यात 217 दहशतवादी आहेत. ही संख्या गेल्या दशकभरात सर्वात कमी आहे. मात्र काश्‍मिरात अस्थिरता निर्माण करण्यासाठी ड्रोन आणि भूयारातून शस्त्रे पाठवण्याची पाकिस्तानची योजना निशिचतच चिंताजनक आहे.

मात्र त्यावर आम्ही अत्याधुनिक यंत्रणेद्वारे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहोत. ड्रोनचा वापरच करता येऊ नये यासाठी आम्ही टेहळणीच्या अत्याधुनिक यंत्रणा वापरत असून त्या ड्रोनचे सिग्नल बंद पाडत आहोत, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.