देहूरोड – देहूरोड परिसरातील नागरी भागात घर बांधकाम करणाऱ्या नागरिकांना लष्कराच्या क्युआरटी (शीघ्र कृती दल) पथकाकडून गस्त घालताना धमकावले जाते. त्याच्या या जाचक त्रासामुळे परिसरात घरांची दुरुस्ती व बांधकाम करणाऱ्यावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लष्कराच्या या कारवाई विरोधात शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि. 16) एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
देहूरोड परिसरातील नागरी भागात रेडझोनचे कारण दाखवून लष्कराने गस्त वाढवली आहे. गस्तीसाठी नियुक्त केलेल्या पथकातील सशस्त्र जवानांकडून नागरी भागातील घर दुरूस्तीची कामे, खासगी जागेवरील बांधकामे रोखण्यात येतात. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे शहर शिवसेनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, समन्वयक रमेश जाधव, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, सुनंदा आवळे, विलास हिनुकले, संजय पिंजण, राजेंद्र तरस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, ऍड. प्रवीण झेंडे, मिक्की कोचर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक हाजीमलंग मारिमुत्तु, गोपाळराव तंतरपाळे, रेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस धर्मपाल तंतरपाळे आदी यावेळी उपस्थित होते. या आंदोलनास विविध पक्ष, संघटना, परिसरातील ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला.
खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांची भेट घेऊन चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाल्यामुळे खासदार बारणे यांनी आंदोलकांना उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले.