नवी दिल्ली – राजस्थानमधील अशोक गहलोत सरकारमधील मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे. राज्यमंत्री राजेंद्र गुढा यांनी हे विधान केलं आहे. राज्यमंत्री झाल्यानंतर गुढा हे पहिल्यांदाच आपल्या मतदार संघात गेले होते. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्यावर टीप्पणी केली.
गुढा हे पौख गावात रस्त्याच्या कामाच्या भूमिपुजनासाठी गेले होते. यावेळी लोकांनी चांगल्या रस्त्यांची मागणी केली. त्यावर गुढा म्हणाले की, रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसारखे हवेत. त्यानतंर ते उपस्थित नागरिकांना म्हणाले, नवीन अभिनेत्री आली तिच नाव काय ? उपस्थितांनी कॅटरिनाचं नाव घेतलं. त्यावर गुढा म्हणाले रस्ते कॅटरिनाच्या गालांसारखे हवेत.
या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंते उपस्थित होते. त्यांना उद्देशून गुढा म्हणाले की, रस्ते कॅटरिनाच्या गालांसारखेच असायला हवे. राज्यमंत्र्यांच्या याविधानाची चांगलीच चर्चा होत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
अभिनेत्रींच्या गालांची तुलना रस्त्यांशी झाल्याची ही पहिली घटना नाही. याआधी लालू प्रसाद यादव यांनी देखील रस्ते आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालांची तुलना केली होती.