नवी दिल्ली – मुस्लिमांच्या बाबतीत जे घातक निर्णय कर्नाटकात भाजपप्रणित संघटनांकडून आणि प्रशासनाकडून घेतले जात आहेत त्यातून कर्नाटकातील भाजप सत्तेचा शेवट होईल असे विधान माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केले आहे.
देवेगौडा यांनी गुरुवारी येथे एएनआयशी बोलताना, सांगितले की हिजाब आणि मशिदीवरील लाऊड स्पीकरच्या बंदीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचा अंत जवळ आला आहे. कॉंग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनीही राज्यातील सत्ताधारी भाजपला फटकारले आहे त्यांनी म्हटले आहे की भाजप मुस्लिमांना त्रास देत आहे. कर्नाटकातील काही उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणारे ध्वनिक्षेपक बंद करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर या नेत्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
बेंगळुरू पोलिसांनी 301 मशिदी, मंदिरे, चर्च आणि इतर आस्थापनांना त्यांचे लाऊडस्पीकर परवानगी असलेल्या डेसिबल पातळीमध्ये वापरण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. बजावण्यात आलेल्या 301 नोटिसांपैकी 59 पब, बार आणि रेस्टॉरंटना, 12 उद्योगांना, 83 मंदिरांना, 22 चर्च आणि 125 मशिदींना देण्यात आल्या आहेत.