पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या सत्रातील शैक्षणिक वर्षाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यापीठ विभाग आणि महाविद्यालयांना अध्ययन- अध्यापनाची प्रक्रिया व त्या पद्धतीने कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
“वाणिज्य व व्यवस्थापन’ या विद्याशाखेंतर्गत एमबीए, एमसीए, कॉमर्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाची पहिली सेमिस्टर 18 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यानंतर दुसरे सत्र 2 मे पासून सुरू होणार आहे. दुसरे सत्र 20 ऑगस्टला संपणार आहे. त्याचप्रमाणे मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत कला, सामाजिक शास्त्र ही अभ्यासक्रमाचे पहिले सत्र 15 मार्चला संपले आहे. आता दुसरे सत्र 21 मार्चपासून सुरू झाले आहे. दुसऱ्या सत्रासाठी साधारणत: 27 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत विज्ञान, बी.फार्मसी, एम.फार्मसी, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाची पहिली सत्र 6 एप्रिल रोजी संपली आहे. आता दुसरी सत्रासाठी 11 एप्रिल ते 23 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे आंतरविद्या शाखीय विद्या शाखेंतर्गत शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र, ग्रंथालयशास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सत्रासाठी साधारणपणे 2 मे ते 30 ऑगस्ट असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.